प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न:
पनवेल (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे) : गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साहात, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला.
यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. संपूर्ण प्रभू आळी परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने व ढोल-ताशांच्या गजराने नटला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या आगमन सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रितमदादा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे मंडळ समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबर समाजसेवेचा संदेश देत आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या कुशल नियोजनामुळे सोहळा यशस्वीरीत्या पार पडला महिला मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा मागील ३५ वर्षांपासून ओंकार मित्र मंडळ धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य देते. बाप्पासाठी हार-फुलं न आणता “एक वही – एक पेन” ही संकल्पना राबवली जाते. जमा झालेली शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. दरवर्षी अनाथाश्रमांना भेट देऊन अन्नदान करण्याचा उपक्रमही राबवला जातो. प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम व इतर सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल राम फडतरे यांनी दिली. या मंगलमय सोहळ्यात श्री.प्रितम म्हात्रे यांनी सपत्नीक सौ. ममता म्हात्रे यांच्यासह उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले.
प्रितम जनार्दन म्हात्रे (मा.विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका):
३५ वर्षांचा अखंड प्रवासात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी हे पनवेलमधील एक आदर्श मंडळ ठरले आहे. भक्ती, संस्कार, समाजकार्य आणि उत्सव यांचा सुंदर संगम साधत लोकांना एकत्र आणण्याचे कार्य या मंडळाने सातत्याने केले आहे.

