ट्रान्समिशन प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे दिले निर्देश
पालघर (प्रतिनिधी): वीज पारेषण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस असून राज्याला आणि देशाला ऊर्जा सक्षम बनवण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हयात विविध अति उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्याभरात सुरू असलेल्या विविध ट्रान्समिशन प्रोजेक्ट कामकाजाचा आढावा नुकताच पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या वतीने घेण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सर्व संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा व प्रकल्पसंस्था समवेत घेऊन संबंधित विभागांना या प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.
सदर बैठकीस महसूल विभागासोबतच वनविभाग, भूमिअभिलेख, कृषी, आणि पोलीस इत्यादी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि इतर यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश हा प्रकल्पांच्या उभारणीचा आढावा घेऊन कामकाजातील उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे, तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधणे हा होता.
प्रकल्पांच्या कामकाजाला गती देण्यासाठी, जिल्हाधिकारी पालघर डॉ. इंदू राणी जाखड यांनी भू-सर्वेक्षणाचे व जमीन मोजणीचे काम तात्काळ पुर्ण करणे, जमिनीच्या मोबदल्याचे दर निश्चित करणे, तसेच वनहक्क कायदयानुसार (FRA) प्रमाणपत्रास मंजुरी तात्काळ देण्याचे महत्व अधोरेखित केले. एक अभिनव उपक्रम म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वीज प्रसारण प्रकल्पांच्या समन्वयासाठी श्री. तेजस चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली असून ते या प्रकल्पांशी संबंधित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी समन्वय साधतील. तसेच सर्व संबंधित यंत्रणांशी संवाद साधून अडचणींचे वेळेवर निराकरण करण्याची कामे देखील करतील.
राज्यबाहेरील वीजनिर्मिती प्रकल्पांतून हरित ऊर्जा आयात करण्यासाठी महाराष्ट्रात उच्च-दाब वीज प्रसारण लाईन उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे. नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे हे राज्याच्या ऊर्जा धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असून, स्वच्छ ऊर्जेचा वाटा वाढवणे, हवामान बदलाचे धोके कमी करणे आणि अंतिमतः ग्राहकांसाठी वीज दर कमी करणे यावर भर दिला जात आहे.
अति उच्चदाब वीज वाहक यंत्रणा उभारत असता ज्यांच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. त्यांना समाधानकारक मोबदला देण्याची तजवीज देखील केली जाते. इतकेच नव्हे तर सदरहू जमिनींचे सातबारा हे जमीन मालकांच्याच नावावरती राहतात. उच्चविज वाहक तारा आणि टॉवर खाली जमीन मालक पारंपारिक शेती व्यवसाय देखील करू शकतात.
आमच्या शेत जमिनीमध्ये हाय व्होल्टेज पॉवर लाईन चा टॉवर उभारलेला आहे. परंतु आम्ही त्याच्या खाली बिनधास्तपणे शेती करत आहोत. टॉवर खाली आमचा ट्रॅक्टर व्यवस्थित रित्या फिरवून जमिनीची मशागत होते. हाय व्हल्टेज लाईन मधून कुठल्याही स्वरूपाचा आवाज येत नाही की आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा त्रास होत नाही. आमच्या जमिनीवर टावर पडला असला तरी देखील सातबारा उतारा आमच्याच नावावर आहे.
अर्चना भोईर - भूधारक,विक्रमगड.